रत्नागिरी : समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळ यांचा आनंद डिव्यांग मुलांना घेता घेता येत नाही. अशा दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आरे वारे येथे झिपलाईनचा आनंद लुटण्याची संधी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने उपलब्ध करून दिली. यामुळे दिव्यांगांच्या मनातील भीती दूर झाली आणि त्यांच्या उत्साह वाढला.
आरे वारे येथील ओशनफ्लाय झिपलाइने या दिव्यांगांना मोफत झिपलाईनचा आनंद अनुभवायला दिला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) आणि ओशनफ्लाय झिपलाईन यांच्या सहयोगाने दिव्यांगांनी जागतिक पर्यटन दिन अनोख्या रितीने साजरा केला.
आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना खूप दिवसांपासून आपल्या दिव्यांग बाधवांनाही आरेवारेचा अथांग समुद्र न्याहाळत झिपलाइनची संधी द्यायची होती. अनेक दिवस त्यांच्या मनात हा विचार घोळत होता. मग त्यांनी पर्यटन दिनाचे औचित्य साधून ओशनफ्लाय झिपलाइनच्या गणेश चौघुले यांच्याशी संपर्क साधला. चौघुले यांनी आरएचपीच्या दिव्यांग सदस्यांना मोफत झिपलाइनची सैर घडवली.
झिपलाइन म्हणजे आरे वारेच्या एका टेकडीवर बांधलेल्या रोपवरून सुरक्षितरित्या लोंबकळत किनाऱ्यावर जाणे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेऊनच रोपवरून सैर घडवली जाते. ओशनफ्लाय झिपलाईनचे गणेश चौगुले यांनी आपला अमुल्य वेळ दिव्यांगांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिला. त्यांचे सहकारी राजेश मोहिते, सुरज चव्हाण, सुरज मयेकर, विजय शिवलकर, विधी शिवलकर यांनी दिव्यांगांना रोपवेवर चढविणे, उतरविणेसाठी खूप मदत केली. आरएचपी फाउंडेशनचे समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे यांच्या सहकार्याने समिधा कुळये (अस्थीव्यंग सोलगाव), कल्पना भागण (अस्थीव्यंग, फुफेरे), आयेशा काझी (सेरेब्रल पाल्सी पावस), सचिन शिंदे (सेरेब्रल पाल्सी गणेशगुळे) यांनी झिपलाइनचा आनंद घेतला.