रत्नागिरी : तालुक्यातील चवे वाघोळीवाडी व चवे सोनारवाडी येथील भर वस्तीत बुधवारी साडेतीन-चारच्या दरम्यान गवा रेडा अतिशय आरामात शांत चालीत चालताना आढळून आल्याने गावातील ग्रामस्थांना अक्षरशः घाम फुटला.

वाघोळी व सोनारवाडी भागातून हा रेडा चालताना ग्रामस्थांना दिसता क्षणी ग्रामस्थांनी गवा रेडा पाहण्यासाठी लांबूनच गर्दी केली.काही मंडळींनी मोबाईलद्वारे गावातील ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला. त्यामुळे रस्त्यावरील ग्रामस्थ सावध झाले.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

 चवे वाघोळी व सोनारवाडीतील ग्रामस्थांच्या घरांच्या बाजूने हा गवा रेडा गेल्यामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. सहा महिन्यापूर्वी गावातील गोणबरे बंधूंना असेच दोन गवा रेडे दृष्टीस पडले होते. मात्र या गोणबरे बंधूंच्या बोलण्यावरती गावाने विश्वास ठेवला नव्हता.आज मात्र प्रत्यक्षात गवारेडा गावकऱ्यांच्या दृष्टीस पडला.

हा रेडा चालताना सावकाश चालत होता याचा अर्थ तो जखमी स्थितीत असावा असे ग्रामस्थांनी बोलून दाखवले.चवे गावातून सोनारवाडी नदीमार्गी तो खालगाव शिर्के वाडीकडे तो जाताना ग्रामस्थांनी पाहिला.