वडवणी तालुक्यातील देवडी येथील शिवाजी चौकात जुगार अड्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने छापा मारून सात जुगार्‍यांना जेरबंद करत त्यांच्याकडून नगदी 21 हजार रूपयाची रोकड तर पावणे दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई केल्यानंतर या पथकाने बीड परळी रोडवरील वडवणी येथील हॉटेल राज मटन या खानावळीच्या बाजूला छापा मारून त्याठिकाणी मटका जुगार खेळताना चार जणांना ताब्यात घेतले.

वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करते. जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून काल तालुक्यातील देवडी याठिकाणच्या जुगार अड्यावर छापा मारला असता त्याठिकाणी भास्कर झाटे, सुरेश खडूळ, सोनाजी पुंडके, उध्दव काकडे, रावसाहेब सोळंके, प्रकाश अंबुरे, बाळासाहेब गायकवाड यांना जुगार खेळताना रंगेहात पकडून त्यांच्याकडून 21 हजार 130 रूपये नगदी रोख रक्कम तर 1 लाख 77 हजार 630 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल केला

सदरचे पथक तेथून थेट वडवणीत आले. येथील हॉटेल राज मटन खानावळीच्या बाजूला मटका जुगार चालु असल्याची माहिती पथकाकडे होती. त्यांनी त्याठिकाणी छापा मारून मटका खेळणार्‍या आणि घेणार्‍या व्यक्तींना ताब्यात घेतले. यामध्ये शिवाजी, राहुल जाधव, प्रल्हाद नागरगोजे, शेख कलीम यांचा समावेश आहे. याठिकाणवरून 20 हजार नगदी रोकडसह 47 हजार 120 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अमलदार बालाजी बास्टेवाड, किशोर गोरे, विनायक कडू, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली आहे.