समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे वारंवार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र राबविले जाते. त्यामध्ये अवैध धंदे करून समाजाची शांतता बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करत कायद्याचा वचक निर्माण केला जातो. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली गेल्या दहा दिवसांमध्ये ३९ प्रकरणांमध्ये तब्बल १०९ आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दि.१७.०९.२०२२ ते दि.२७.०९.२०२२ या दहा दिवसांच्या कालावधीत वाशिम पोलीस घटकातील पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत ०५, पो.स्टे.मालेगाव हद्दीत ०३, पो.स्टे.रिसोड हद्दीत ०७, पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीत ०२, पो.स्टे.आसेगाव हद्दीत ०६, पो.स्टे.कारंजा शहर हद्दीत ०९, पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीत ०१, पो.स्टे.मानोरा हद्दीत ०५ व पो.स्टे.धनज हद्दीत ०१ असे सर्व मिळून एकूण ३९ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीसांनि छापा टाकला आहे.दि.२६.०९.२०२२ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा यांच्या पथकाने कारंजा शहरातील इंदिरा गांधी चौकातील बजरंग हॉटेलच्या मागे असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी ३० जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली असून जुगार साहित्यासह ४०,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माहे सप्टेंबर – २०२२ मध्ये दि.१७.०९.२०२२ ते दि.२७.०९.२०२२ पावेतो वाशिम पोलीस घटकात एकूण ‘वरली-मटका-जुगार’ विरोधात ३९ प्रकरणांमध्ये १०९ आरोपींविरोधात गुन्हे नोंदविले असून त्यामध्ये २,००,५७१/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अवैध धंदे ‘वरली-मटका-जुगार’ विरोधात वाशिम पोलीस दलाने वर्षभरात कारवाई करत तब्बल ६३६ प्रकरणांमध्ये १६१०च्या वर आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये जवळपास ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध धंद्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अंमलदार यांना द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.