पर्यटन दिनी अनुभवला सोलापूरचा भुईकोट किल्ला!

इको फ्रेंडली क्लब, पर्यटन संचालनालय आणि एमटीडीसीचा उपक्रम

सोलापूर : जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी मंगळवारी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात भ्रमंती करून इतिहास जाणून घेतला.

इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली भुईकोट किल्ला भ्रमंतीचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यटन दिनानिमित्त रीथिंकिंग टुरिझम या अंतर्गत आयोजित या भ्रमंतीला पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. इतिहास अभ्यासक, लेखक नितीन आणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याच्या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.

दिंडी दरवाजा, हत्ती दरवाजा, शहर दरवाजा, बुरुज, 32 खांबी वास्तु, मुंजा बाबा मंदिर, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, नागबावडी विहीर, पद्मावती देवी मंदिर, खंदक, तोफा, विरघळ यासह विविध शिल्पांची माहिती इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी दिली.

अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली.. सोलापूरचा भुईकोट किल्ला जवळून अनुभवता आला.. मुंजाबाबा आणि पद्मावती देवी यांच्याविषयी ऐकले होते, आज प्रत्यक्ष त्यांच्या मंदिरांना भेट देता आली.. इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याची छान माहिती दिली अशा प्रतिक्रिया उपस्थित पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या.

‘आपल्या शहराचा आणि भुईकोट किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. सोलापुरात येणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना भुईकोट किल्ला प्रत्येकाने दाखवायला हवा. तुम्ही तुमच्या वाढदिवसाला भुईकोट किल्ला भ्रमंतीचा उपक्रम राबवू शकता’, असे आवाहन इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी केले. 

प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी रेल्वे अधिकारी संतोष घुगे, चडचणकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संचालक सोमनाथ चडचणकर, किरीयाड हॉटेलचे संचालक गिरीश चडचणकर, पेट्रोल पंप चालक योगेश चडचणकर, यश कन्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, उद्योजक धिरेंद्र कपूर, प्राची कपूर, योगेश पंचे, दयानंद आडके, संतोषकुमार तडवळ, अथर्व तडवळ, सुनील थिटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, गव्हर्नमेंट व्हॅल्युएटर किशोरी शहा, अक्षया शहा, हिंदवी परिवाराचे जिल्हाध्यक्ष अमृत काटकर, सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमखंडी, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक सटवाजी कोकणे, इको फ्रेंडली क्लब सदस्य अनिरुद्ध कदम, अनिल हिरेमठ, संगमेश्वर शरणार्थी उपस्थित होते.

ही भटकंती यशस्वी करण्यासाठी पर्यटन संचालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर-दातार आणि पर्यटन विकास महामंडळ, पुणे विभागाचे व्यवस्थापक दीपक हरणे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी महादेव कांबळे यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया 

मी गेल्या पंधरा वर्षापासून भुईकोट किल्ल्याच्या समोर राहायला आहे. आज भुईकोट किल्ला भ्रमंतीमधून खूप महत्त्वाची माहिती मला समजली. मी इथे नवीन राहायला आले तेव्हा लोक म्हणायचे एक महिला रात्री किल्ल्यात गाणे म्हणते. मी अनेक दिवस निरीक्षण केले. एक पांढरा कपड्यातला माणूस मला फिरताना दिसला, सकाळी उठून पाहिले तर तो या ठिकाणचा वाचमन होता. 

- किशोरी शहा, 

सदस्य, इको फ्रेंडली क्लब

सोलापुरात राहूनही भुईकोट किल्ल्याबद्दल फारशी माहिती नव्हती. इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर यांनी भुईकोट किल्ला संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रत्येक सोलापूरकरांनी एकदा तरी भुईकोट किल्ला पाहिलाच हवा. पर्यटन दिनानिमित्त इको फ्रेंडली क्लबने आम्हाला छान संधी उपलब्ध करून दिली.

- योगेश चडचणकर,

पेट्रोल पंप चालक