सोलापूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद आणि जिल्हाध्यक्ष पद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, दिलीप कोल्हे, महेश गाडेकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत तर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील हे इच्छुक असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे जिल्हा परिषदेत आले असता पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधला. मागील काही दिवसापासून काका यांची तब्येत बरी नसल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांनी काका तब्येत बरी आहे का? असा प्रश्न केला असता मरणाच्या दारातून परत आलो, फारच थकवा आलेला आहे असे उत्तर त्यांनी दिले.
त्यावर काका कशाला त्रास करून घेताय आराम करा असे पत्रकारानी सांगितले असता आता थकलो आहे मी जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी तसेच महिला जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेली धसपूस पाहता पक्षअध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्षपद बाबतही निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.