नांदरची स्वयंभू श्री रेणूकादेवी...

"आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवात नांदरकर दुमदुमले"            

पाचोड(विजय चिडे) आई राजा उदे उदे, रेणुका माता की जय अशा जयघोषात पैठण तालुक्यातील नांदर येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री रेणूकादेवी मंदिरात सोमवारी सकाळीपासून विधीवत पूजा, महाआरती करुन मंदिरात घटस्थापना करण्यात आली. दोन वर्षानंतर यंदा भाविकांना घटस्थापनेवेळी उपस्थित राहता आल्याने भाविकांत आनंद, उत्साह दिसून येत आहे.

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत नांदर ता.पैठण येथील श्री स्वंयभू रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

नांदर गाव पुर्वीच्या काळी 'नंदीग्राम' नावाने ओळखले जात असे,प्रभु रामचंद्र लंका दहन करून आयोध्येला परत जात असतांना या भागातील राजा वीरभद्र यांच्या विनंतीवरून येथे मुक्काम केल्याची आख्यायिका आहे.

त्यांनी स्नान केलेली बारव आता रामकुंड नावाने ओळखली जाते.मुक्काम करून परत जात असतांना प्रभु रामचंद्रानी राजा वीरभद्र यासं " तुम्हाला काय हवे ते मागा " असे सांगितले पंरतू यावर राजा वीरभद्र म्हणाले की, "तुमचे पावन चरण या भूमीला लागले,हे आमचे भाग्य आहे. मला काही नको". यावर प्रभु रामचंद्र यांनी सांगितले की,मी ज्या नदी पात्रात उभा आहे.

हे नदीपाञ यापुढे विरभद्रा नदीपाञ म्हणून ओळखले जाईल. तेव्हा पासून गावा जवळील नदीचे नाव विरभद्रा असल्याचा उल्लेख संत एकनाथ महाराज यांच्या भागवत कथेत येतो.

गावातील भाविकांनी रेणूका देवी मंदीराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून कै.माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र रविंद्र काळे व रामचंद्र काळे यांनी स्वतः मंदीराच्या गाभाऱ्याचे काम करत असून आता पर्यंत 70 लक्ष रूपये त्यांनी या गाभाऱ्यासाठी खर्च केला आहे.तसेच मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी गावातील दानशूर मदत करत आहेत. या शारदीय नवराञोत्सवाची सांगता अष्टमी होमहवन सुरू होऊन नवमीत पुर्णाआहूती पडून होईल अशी माहीती पुजारी अँड.किशोर वैद्य व गोपाल वैद्य यांनी दिली आहे.