नाथ सांप्रदायातील महान योगी प पू सदगुरु श्री डॉ भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र नाशिककडे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. प पू सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र नाशिक या पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सोहळ्याचे हे ११ वे वर्ष आहे. सोमवार दि. २६ रोजी पहाटे पाच वाजता जेष्ठ विधिज्ञ अॅड डी एस राऊत व त्यांच्या पत्नी दीपा राऊत या उभयतांच्या हस्ते पादुकांची विधीवत प्रस्थान पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. सुलक्षणादेवी मोहिते पाटील व जि प सदस्या स्वरूपराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पादुकांची पूजा, आरती करण्यात आली. सकाळची न्याहरी घेवून सोहळा खराडे पाटील यांचे निवासस्थानी पोहोचला. येथील दर्शन सोहळा पार पडल्यानंतर दुपारी १ वाजता पुणे जिल्ह्यातील निमसाखर येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे यांनी सपत्निक पूजा व आरती केली. दुपारचा नैवेद्य व महाप्रसाद घेवून सोहळा सणसर, बारामती, दौंड मार्गे पारगाव (नगर) मुक्कामी पोहोचला. सोहळ्याचा दुसरा मुक्काम श्री क्षेत्र नाशिक येथे राहिल. बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी प पू गजानन महाराज गुप्ते यांची ७६ वी पुण्यतिथी सोहळा आहे. या दिवशी पादुकांना गोदावरी स्नान, नगर प्रदक्षिणा, कीर्तन, आरती व महाप्रसाद असा कार्यक्रम होइल. गुरुवार दि. २९ रोजी सोहळा परतीच्या प्रवासात देहू मुक्कामी तर शुक्रवार दि. ३० रोजी आळंदी, पुणे, नातेपुते मार्गे वेळापूर मुक्कामी पोहोचेल.