बीडच्या योगा ग्रुपचा ब्रह्मगिरी मॅरेथॉनमध्ये झेंडा !संतोष भोकरे यांनी पटकावला दुसरा क्रमांक; संस्कार माने चौथ्या स्थानी
बीड : शहरातील चंपावती क्लबवरील योगा ग्रुपच्या जवळपास पन्नास सदस्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी परिक्रमा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. रविवारी झालेल्या या स्पर्धेत योगा ग्रुपच्या संतोष भोकरे यांनी दुसरा क्रमांक पटकावला तर दहा किलोमीटरच्या स्पर्धेत बारा वर्षाच्या संस्कार माने याने चौथा क्रमांक पटकावला.
बीड येथील योगा ग्रुप सायकलिंग व रनिंग अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत आपला ठसा उमटवत आहे. यापूर्वीही राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी सहभागी होत यश मिळवले आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी परिक्रमा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 10, 22, 44 आणि 66 कि.मी. असे चार प्रकार होते. यापैकी 10 आणि 22 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये योगा ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. यात राज्यभरातून पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 22 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत बीड येथील एलआयसीमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संतोष भोकरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत संस्कार माने (वय 12 वर्ष) याने चौथा क्रमांक पटकावला. संतोष भोकरे यांना नाशिक येथील पोलिस अधिक्षक शिवाजी पवार, पोलिस अधिक्षक प्रदिप जाधव यांच्या हस्ते परितोषीक प्रदान करण्यात आले. याबरेाबरच प्रकाश दामा व जयलाल राजपुत हे पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये आले. योगा ग्रुपच्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.
यांनी नोंदवला सहभाग
योगा ग्रुपचे डॉ.अनिल थोरात, कल्याण कुलकर्णी, बालासाहेब माने, बंडू आगलावे, ज्ञानेश्वर भोईटे, डॉ.दत्ता साळुंके, डॉ.दिनकर घुगे, डॉ.विश्वास गवते, डॉ.दिवाकर गुळजकर, डॉ.मोगले, डॉ.नाईकवाडे, डॉ.संदिप येवले, गणेश मैड, गणेश नवले, जगदीश पडुळे, सुदाम खोसरे, लक्ष्मीकांत महाजन, महादेव जायभाय, मेघराज पिंगळे, प्रविणकुमार नाईकवाडे, प्रदिप जगताप, नितीन अघाव, राजु पिंगळे, संदिप मानुरे, संतोष जाधव, विनोद गर्जे, डॉ.अप्पासाहेब बागलाने, रणजित मस्के, बाळासाहेब कांबळे, डॉ.राजेश शिंदे, भाऊसाहेब जाधव, संतोष कंठाळे, गणेश धांडे, ओंकार सानप, इब्राहिम पठाण, डॉ.आगाखान पठाण यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे डॉ.गुळजकर, डॉ. शिंदे व डॉ.बागलाने हे कुटूंबासह या स्पर्धेत सहभागी झाले होते.
योगा ग्रुप बनतोय बीडची ओळख
स्पर्धेच्या, धकाधकीच्या सध्याच्या काळात आरोग्या सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करायलाच हवा असे अनेकजण म्हणतात, परंतु प्रत्यक्षात कृती मात्र होत नाही. ही कृती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कामच जणू आता बीडचा योगा ग्रुप करत आहे. सायकलिंग, धावणे या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत हा ग्रुप बीडचे नाव राज्यभरात पोहचवत आहे. याबरेाबरच बीडकरांना व्यायामाची गोडी लागावी यासाठीही प्रोत्साहन देत आहे. योगा ग्रुपच्या सदस्यसंख्येत हळूहळू वाढ होत असून यापासून प्रेरणा घेत सायकलिंग व धावण्याच्या व्यायामाकडे वळत असल्याने योगा ग्रुप सुदृढ बीडची ओळख बनला आहे.