अहमदनगर - अल्पवयीन मुलासह गणेशवाडी येथील एका युवकास कुठलाही गुन्हा नसताना केलेली बेदम मारहाण सर्वांना चांगलीच महागात पडली. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबित केलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य एका पोलिसावर आज सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, फौजदार उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण व बाबा वाघमोडे या चौघावर बेदम मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 एप्रिल 2022 रोजी कुठलाही गुन्हा नसताना घरुन बेड्या घालून पोलीस ठाण्यात आणले यानंतर आरोपींनी दमदाटी करुन पट्टा व पायाच्या लाथेने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मारहाणीनंतर 17 एप्रिल 2022 रोजी अजय मोहिते यांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली होती. 23 एप्रिल 2022 रोजी परिसरातील सातशेहून अधिक युवकांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. कोणाच्या सांगण्यावरून चूक नसताना बेड्या घालून मारहाण केली त्यांच्यासह चार पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंदोलकांनी केली होती. जाहीर भाषणात युवकांनी पोलीस कृत्याचा निषेध केला होता. शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी त्यावेळी चौकशी नेमून दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने बेशीस्त व हालगर्जीपणाचे वर्तन तसेच पुढील चौकशीत हस्तक्षेप व साक्षीदारावर दबाव टाकू नये याकरीता सोमवार (ता. 25) रोजी बागुल, पतंगे, चव्हाण व अनिल जाधव या चौघांना निलंबित करण्यात आले होते. आज तातडीने वरील तिघे व बाबा वाघमोडे वर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत..