१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सेवा पंधरवडा दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून सोमवारी (ता.२६) दिव्यांग व्यक्तीना वैश्र्विक ओळखपत्र वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते २ आक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत पुर्वा रविंद्र झेंडेकर, अमोल पुरुशोत्तम म्हात्रे, संतोष धर्मा पाटील, अतेश अरुण जुईकर, अंकिता अनंत कुलकर्णी, संध्या सुरेश पाटील, रुचा विश्वासराव तांबोळी, रुद्रा शेलेश शिंदे, गुरुनाथ बाळू नाईक यांना प्रातिनिधिक स्वरूपात वैश्र्विक ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील सहाय्यक सल्लागार श्री. वेखंडे यांच्यासह समाजकल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
 
  
  
  
   
   
   
   
  