भद्रावती, तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. या कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावक-यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना जाब विचारला.केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या नंतरही सुधारीत नियुक्तीपत्र का दिले नाही. तसेच हजारीबाग (झारखंड) येथे असलेल्या त्रिवेणी माईन्सच्या धर्तीवर कामगारांचे किमान वेतन का लागू केले नाही. किमान कोल वेतनानुसार कामगारांचे वेतन ठरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात 21 जुलै 2022 रोजी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या किमान कोल वेतनाबाबत बैठक घेण्यात आली होती. मात्र तरीसुध्दा कर्नाटक एम्टा याबाबत चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार, कर्नाटक सरकार, एम्टा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी मुंबईत बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले