अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागणे गरजेचे आहे. बोगस जातप्रमाणपत्र घेऊन राजकीय लाभ उठवणाऱ्या खासदार नवनीत राणांवर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणी बोगस जातप्रमाणपत्र काढण्याची हिम्मत करू नये, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा यांनी अमरावती या अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून २०१९ साली लोकसभा निवडणुक लढवून त्यात विजय मिळवलेला आहे. आपण अनुसुचित जातीचे असल्याचा दावा करून नवनीत राणा यांनी ही निवडणूक लढविली होती परंतु त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करून त्यांनी अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आणि बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे परंतु नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवलेली आहे.
नवनीत राणा यांनी अनुसुचित जातीचे बोगस जातप्रमाणपत्र मिळवून खासदारकी मिळविली व मागास समाजातील एका होतकरू व्यक्तीची संधी हिरावून घेतली आहे. बोगस जात प्रमाणपत्र काढून त्याचे लाभ घेणाऱ्या नवनीत राणांसारख्या लोकांना कठोर शासन झाले पाहिजे. मागील अनेक दिवसांपासून बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण स्वतः व काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे. माननीय न्यायालयाने या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता गरज आहे ती त्यांच्या कारवाई करण्याची, असे राजहंस म्हणाले..