दारूच्या नशेत पोलीसांना खोटी माहिती देणार्या मुस्ती येथील इसमावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रोहित नागनाथ थोरात यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री आरोपी सादुल राणू गायकवाड (वय वर्षे 25,रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर ) याने डायल 112 वर कॉल करून अकरा कुत्र्यांना वीष देऊन मारल्याचे म्हटले. आणखीन बाकी कुत्र्यांना मारणार आहे. त्याकरिता पोलीस मदत हवी आहे, अशी खोटी माहिती दिली.
आपण पोलीसांना देत असलेली माहिती खोटी आहे. याची त्याला पूर्ण कल्पना असताना देखील त्याने दारूच्या नशेत कॉल करून शासकीय सेवकाला खोटी माहिती दिली आहे. म्हणून फिर्यादीने सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम 177 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे. सदर आरोपी विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना बंदीछोडे करीत आहेत.
 
  
  
  
   
  