बीड, दि. 24 (जि. मा. का.) :- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ज्वारी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थीना लाभ देऊन बियाणे शिल्लक राहिल्यास शेतकरी वर्गास परमिट देऊनही लाभ देता येईल. त्यासाठी आपले गावाचे कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी यांना ७/१२ , ८ अ , आधार कार्ड, बँक पासबुकसह शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा. जिल्ह्यातील या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ज्वारी पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. यात अनुदानावर फुले रेवती व फुले सुचित्र या वाणाचे १०० टक्के अनुदानावर लाभ दिला जाणार आहे. या योजनेत वाटप करण्यात येणाऱ्या ज्वारी वाणाचे गुण वैशिष्ठ ज्वारी पिकाचे ताटे भरीव , रसदार व गोड असल्याने कडबा जनावरे गोडीने खातात व यास बाजारभाव चांगला मिळतो. तसेच ज्वारी दाणे चमकदार असतात. उत्पादित मालास बाजारभाव चांगला मिळतो. तसेच सदरील वाण खोडमाशी, खोडकिडीसाठी प्रतीबंधक आहे. अशा उच्च गुणवत्ता असलेले १० वर्षातील सुधारित वाणांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात ३३९२८ हेक्टरवर हा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. प्रती शेतकरी अधिकतम १ हेक्टर क्षेत्रावर लाभ दिला जाईल.