शिंदे-फडणवीस सरकारने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) स्थापन करावी  अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा समानतेचा विचार त्यांचे साहित्य जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण आणि मातंग समाजाच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवण्यासाठी स्पर्धा परिक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन मातंग समाजाच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवण्याचे काम करता येईल या उद्देशासाठी शिंदे-फडणवीस सरकारने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रीय मातंग महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

राज्यात सध्या मातंग व तत्सम समाजासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात आहे. मात्र या महामंडळाकडे निधीची कमतरता आहे. शिवाय त्याच्या योजना या विद्यार्थी व तरूणांच्या बदललेल्या शैक्षणिक अपेक्षांची पूर्तता करत नाहीत. या महामंडळामार्फत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या या अत्यल्प आहेत.

मातंग समाजातील विद्यार्थी, तरूणांना उच्च शिक्षण व प्रशिक्षणासाठी संस्थात्मक मदत मिळावी एकूण मातंग व तत्सम समाजासाठी अशी संस्था उभी राहिल्यास त्याचा फायदा मातंग व इतर पोट जातींना मिळेल, म्हणून तात्काळ साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) स्थापना करावी व या संस्थेला स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात यावा असे राजहंस म्हणाले.