रांजणगाव गणपती:- शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC त मोठया प्रमाणात बेकायदेशीर मुरुमाची चोरी आणि वाहतुक होत असुन शिरुरच्या महसूल विभागाचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मुरुमचोर मुजोर झाले असुन त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे रांजणगाव MIDC त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) कार्यालया समोरुनच बेकायदेशीर मुरुमाची वाहतुक करणाऱ्या गाड्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या मुजोर मुरुमचोरांना पोलिसांचा धाक उरलाय का नाही...? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

रांजणगाव MIDC त अनेक ठिकाणी मोकळे प्लॉट असुन रात्रीच्या वेळेस या प्लॉटमधील मुरुमाची मोठया प्रमाणात चोरी करण्यात येते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून कोणतीही रॉयल्टी न देता ही मुरुमचोरी होत असताना आणि अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी पुरावे दिलेले असतानाही शिरुर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांचे या मुरुम माफियांशी काही "साट-लोट" तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. तसेच नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांना काही जागरूक नागरिकांनी वेळोवेळी या बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या गाड्यांचे व्हिडिओ आणि फोटो देऊनही 'कारवाई केली जाईल' या आश्वासना पलीकडे कोणतीच कारवाई झालेली नाही.

रांजणगाव MIDC ट्राफिक पोलिसांच होतंय दुर्लक्ष...?

रांजणगाव MIDC त बेकायदेशीर मुरुम घेऊन येणाऱ्या गाड्या या अनेकवेळा करडे, बाभूळसर या मार्गे कारेगावातुन पुणे-नगर हायवे वरुन यश इन चौकातून MIDC त जात असतात. या गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुरुम भरलेला असतो. या अवजड मुरुमाच्या गाड्यांच्या जवळून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारेगाव येथील यश इन चौक आणि रांजणगाव येथील राजमुद्रा चौकातून औद्योगिक वसाहतीत प्रवेश करायला रस्ता आहे. या दोन्हीही मुख्य चौकातुनच ही अवजड वाहने MIDC त जात असतात.सर्वसामान्य लोकांना दिसणारी ही वाहने त्यामुळे ट्राफिक पोलिसांना दिसत नाहीत का...? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत शिरुरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरी करुन बेकायदेशीररीत्या कंपनीला मुरुम विकणाऱ्या लोकांचे नाव आणि लोकेशन आम्हाला कळविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

रांजणगाव MIDC त बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनावर कारवाई करण्यासंदर्भात ट्राफिक पोलिसांना आदेश देण्यात आले असुन अशा अवजड वाहतुक करणाऱ्या गाड्यांना दंड ठोठावन्यात येईल.

यशवंत गवारी

(उपविभागीय पोलिस अधिकारी,शिरुर)

यापुर्वी रांजणगाव MIDC अनेकवेळा अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत लाखोंचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. यापुढेही अशा बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करण्याच्या सुचना ट्राफिक पोलिसांना दिल्या आहेत.

बलवंत मांडगे, पोलिस निरीक्षक

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन