सोलापूर – जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. असे असले तरी तिरवंडी (ता. माळशिरस) येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 21) घडली आहे.

लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातील २४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून सध्या ४८ लम्पीबाधित जनावारांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ७२ गाय आणि बैल व एक म्हैस अशा ७३ जनावारांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी २३ गाय व १ म्हैस, अशी एकूण २४ जनावारे बरी झाली प्र:स्थितीत ४८ गाय आहेत. सद्य: लम्पीबाधित आहेत. आतापर्यंत ४२ हजार ८९१ जनावारांना लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यासाठी सध्या लम्पी लसचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत माळशिरस तालुक्यात ४९, सांगोला तालुक्यात ११, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, माढा तालुक्यात ५, मंगळवेढा तालुक्यात १, पंढरपूर तालुक्यात २ व बार्शी तालुक्यात १ लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत.