रांजणगाव गणपती:- रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव, शेळकेवस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावारं चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले. त्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांचे आदेशानुसार घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पो. हवा. गुलाब येळे, म.पो. कॉ. मोनिका वाघमारे यांनी भेट दिली. सदर बालकाच्या आई-वडीलांचा व नातेवाईकांचा आजुबाजुला शोध घेतला परंतु उपयुक्त माहिती मिळुन आली नाही. त्यामुळे कैलास पांडुरंग दुंडे यांचे फिर्यादीरुन रांजणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सदर बालकास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोडके यांनी तात्काळ प्राथमीक आरोग्य केंद्र, रांजणगाव येथे औषोधोपचार कामी नेले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. गार्गी, लॅब टेक्नििशयन वैशाली नेमाडे, परिचारीका काजल दावडे यांनी सदर बाळास ताप असल्याने तात्काळ औषोधोपचार सुरु केले असुन सदर बालकाची प्रकृती स्थिर आहे.

सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केल्यानंतर सदर बालकास बालकल्याण समिती क्र 2, पुणे सदस्या संध्या गायकवाड यांच्या समक्ष हजर केले. त्यांनी व पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघमारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी सदर बालकाचे नामकरण वेदांत असे केले. तसेच सदर बालकास बालकल्याण समितीच्या आदेशाने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील अधिक्षका भारतीय समाजसेवा केंद्र यांच्या ताब्यात दिले आहे . सदर बालकाबाबत तसेच त्याच्या नातेवाईकांबाबत काही माहिती असल्यास रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे अवाहन पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी केले असुन सदर गुन्हयाचा पुढीत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहेत.

बेवारस बालकास मिळाली आईच्या मायेची ऊब...

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघमारे यांनी या चार ते पाच महिन्याच्या बालकास आईच्या मायेची ऊब देत आईच्या मायेने कुशीत घेवुन त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबुन त्याच्यावर औषोधोपचार केले आहेत. सदर बालकच्या रडण्याच्या आवाजाने त्यांच्याही डोळ्यातील पाणी पाहुन उपस्थितांनाही गहिवरुन आले.