नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा मुळ पाया रचला स्व.काकूंनी
बीड/ प्रतिनिधी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास जात असताना बुधवारी अहमदनगर ते आष्टी दरम्यान 12 डब्यांची हायस्पीड रेल्वे चाचणी यशस्वी झाली.आणि आता आष्टी ते नगर हा रेल्वे प्रवास सुरु होत आहे, आता पुढे या मार्गाचे काम होऊन बीड जिल्हा वासियांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या रेल्वे मार्गाचा मुळ पाया स्व.केशरकाकूंनी रचला हे बीड जिल्हावासीय कधीही विसरू शकणार नाहीत.
इ.स.1980 साली लोकसभेच्या निवडणूका झाल्या या निवडणूकीत इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने 67 हजार मतांनी स्व.केशरकाकू विजयी झाल्या तेंव्हा देशाच्या पंतप्रधान म्हणून स्व.इंदिरा गांधी यांची निवड झाली. स्व.केशरकाकू यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार्या अनेक विकासात्मक कामांचा पाठपुरावा सुरू केला. बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासासाठी नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे ही मागणी अत्यंत महत्वाची होती म्हणून यासाठी स्व.काकूंनी स्व.इंदिरा गांधी यांना भेटून बीड जिल्ह्यातील नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे असल्यामुळे तो मंजूर करावा अशी आग्रहाने मागणी सातत्याने केली. या रेल्वे मार्गाला मंजूरी मिळावी यासाठी स्व.काकू व तत्कालीन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दोनशे निमंत्रितांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन स्व.इंदिरा गांधी यांची भेट घेऊन हा मार्ग मंजूर करण्यात यावा. बीड जिल्हा हा मागास जिल्हा असून जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे असणे गरजेचे आहे ही बाब स्व.काकूंनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधीत विभागास दिले होते. तेंव्हा नगर-आष्टी-जामखेड-पाटोदा-केज आंबेजोगाई-परळी अशा मार्गाचा प्रस्ताव पुढे आला. मात्र यामध्ये बीडचा नामोल्लेख नव्हता. या मार्गासाठी मोठ्या निधीची तरतूद होणे शक्य नव्हते त्यामुळे स्व.काकू यांनी अहमदनगर-बीड-परळी हा प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे अतिरिक्त निधी कमी झाल्यामुळे या मार्गासाठी 267 कोटी रूपयांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एवढा मोठा निधी बीड जिल्ह्यासाठी केंद्र सरकार एकाच वेळी देऊ शकणार नाही ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता या मार्गासाठी राज्य सरकारने अर्धा वाटा घेतल्यास हा मार्ग होण्यास वेळ लागणार नाही असे सभेत बोलून दाखवल्यानंतर व मागणी केल्यानंतर विलासराव देशमुख यांनी राज्य सरकार अर्धा वाटा देईल अशी घोषणा केली आणि जिल्ह्यातील जनतेला दिलासा दिला. देशभरात रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार अर्धा वाटा देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे हे विशेष. या मार्गाचे काम जलद व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा मार्ग आता पूर्ण होत आहे. स्व.काकू यांच्या नंतर स्व.गोपीनाथराव मुंडे, तत्कालीन खासदार रजनीताई पाटील, विद्यमान खासदार प्रितमताई मुंडे यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी मागण्या लावून धरल्यामुळे आज हा मार्ग पूर्ण होत आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा पाया स्व.काकूंनी रचला हे मात्र तितकेच खरे. याबाबत पाठपुरावा सुरू असताना 1984 साली ऑगष्ट महिन्यात स्व.इंदिरा गांधी यांची स्व.काकू डॉ.भारतभूषण क्षीरसागर, गिरीष देशपांडे सोबत असताना भेट घेऊन लोकसभा निवडणूकीपुर्वी या रेल्वे मार्गाला मंजूरी द्यावी अशी मागणी केली होती परंतू दुर्देवाने काही दिवसातच स्व.इंदिरा गांधी यांची हत्या झाली व त्यानंतर लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या. या निवडणूकीमध्ये स्व.केशर काकू या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आणि पुन्हा त्यांनी या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला तेंव्हा स्व.राजीव गांधी पंतप्रधान होते. यावेळी देखील स्व.काकू यांनी पुन्हा दोनशे ते अडीचशे लोकांचे शिष्टमंडळ घेऊन स्व.राजीव गांधी यांची भेट घेत हा मार्ग मंजूर करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी रेल्वे विभागामार्फत सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावेळी हा रेल्वे मार्ग हिताचा नाही, यामध्ये फार मोठा महसूल मिळणार नाही, हा मार्ग आर्थिक दृष्टया परवडणारा नाही. कोणतेही औद्योगिक शहर नाही असा अहवाल दिल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री जे.के.जाफर शरीफ यांची भेट घेऊन स्व.काकूंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासाठी आम्हाला विकासापासून किती दूर ठेवणार असे वारंवार सभागृहात देखील सांगत या मार्गासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. तेंव्हा झालेल्या निवडणूकांमध्ये कॉग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि स्व.काकू यांनाही निवडणूकीत अपयश आले. या कालावधीत देखील स्व.काकू यांनी हा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. पुढील काळात देशात मध्यावधी निवडणूका जाहीर झाल्या तेंव्हा स्व.राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्या निवडणूकांमध्ये बीड जिल्ह्यातून पुन्हा स्व.काकू यांना उमेदवारी मिळाली आणि पुन्हा काकू निवडणून आल्या तेंव्हा स्व.नरसिंहराव यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली आणि रेल्वे मंत्री म्हणून सुरेश कलमाडी यांनी कार्यभार स्विकारला. त्यावेळी स्व.काकू यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 1995 साली या मार्गाला मंजूरी मिळाली. या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीत चंपावती क्रिडा मंडळावर करण्यात आले होते. त्यानंतरच या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले. या मार्गासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री गणी खान चौधरी, बन्सीलाल, मोहसीना किडवाई, माधवराव सिंधीया, जाफर शरीफ यांच्याकडे खाते असताना त्यांनीदेखील खूप मोठे सहकार्य केलेले आहे. तात्पर्य एवढेच नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग साकारत असताना स्व.काकू यांनी या मार्गाचा रचलेला पाया नव्या पिढीच्या लक्षात रहावा एवढेच.
चौकट
बीड जिल्ह्याच्या रेल्वे मागणीची आता स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. दि 23 रोजी अहमदनगर ते आष्टी पर्यंत रेल्वे प्रवास सुरु होतो आहे,जिल्ह्यातील जनतेचा स्वप्नपुर्तीचा एक टप्पा पूर्ण झाला, याचा आपल्याला सार्थ अभिमान आणि समाधान होत आहे. या मागणीची मूळ सुरुवात स्व.खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी केली होती. त्यास स्वातंत्र्य सैनिक, रेल्वे कृती समिती तसेच स्व.गोपीनाथराव मुंडे, तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख, स्व.विमलताई मुंदडा, तत्कालीन पालकमंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अथक प्रयत्न केले. यासाठी अनेकदा लढा उभारला गेला, संघर्ष झाला.स्वातंत्र्य सैनिक आणि जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर व त्यांचे सहकारी, स्व.अमोल गलधर व त्यांच्या सहकार्यांनी केलेले आंदोलन याची देखील प्रकर्षाने आठवण जाणवते.
त्यावेळी मी देखील स्व.काकु सोबत गेलेल्या शिष्टमंडळात होतो आम्ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना भेटलो होतो व त्यावेळी प्रथम मागणी आम्ही केली होती. अत्यंत किचकट वाटणारा हा मार्ग त्यावेळी होता परंतु काकुंनी अत्यंत अभ्यासु पद्धतीने हे मांडुन याला मंजुरी मिळविली होती व पुढे याचे उदघाटन देखील झाले. मी दरम्यान युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो त्यामुळे मलाही सहभागी होता आले, हे माझे भाग्य आणि कर्तव्य समजतो. आता बीड जिल्ह्याच्या जनतेच्या मागणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे याचे समाधान वाटते. तसेच येथुन पुढच्या राहिलेल्या मार्गासाठी देखील आता नेटाने सर्व पक्षाने प्रयत्न करायला हवेत. मग यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याशी पाठपुरावा सुरु ठेवावा लागेल. यासाठी मी देखील सोबत असेल.डॉ भारतभूषण क्षीरसागर