तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून २२ कोटींचा निधी मंजूर; निविदा प्रक्रिया सुरू*

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

पुणे - तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून या दोन्ही महामार्गांच्या दुरुस्तीच्या २२ कोटी ३१ लक्ष रकमेच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या दोन्ही रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे अनेक अपघात होऊन काही जण जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आग्रह धरला होता. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर एलिव्हेटेड रस्ता बांधण्याचा प्रस्ताव असल्याने दुरुस्तीसाठी निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रस्त्याच्या सद्यस्थितीची कल्पना देत त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांसमवेत बैठक घेऊन नवीन प्रकल्पांची कामे मार्गी लागेपर्यंत दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील कि.मी.००/०० ते कि.मी. ५४/०० या लांबीसाठी सुमारे रु. १० कोटी २६ लक्ष तर पुणे शिरूर रस्त्यावरील कि.मी. ३६/६०० ते कि.मी. ६४/०० या लांबीसाठी रु. १२ कोटी ५ लक्ष इतका निधी मंजूर केला असून सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या माध्यमातून दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी होणारा विलंब विचारात घेऊन या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे. त्यामुळे पुढील काळात वाहनचालकांना होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.

या संदर्भातील माहिती देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीसाठी निविदा काढण्यात येणार असून त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. हे दोन्ही प्रकल्प लवकर सुरू व्हावेत यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात चिंताजनक असल्याने वाहनचालकांची सुरक्षा विचारात घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २२ कोटी ३१ लक्ष इतका निधी मंजूर केला आहे. येत्या २६ सप्टेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे केवळ खड्डे बुजविले जाणार नसून पूर्ण खराब झालेला रस्त्याची सुधारणा व साईड पट्ट्यांची दुरुस्तीही केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे.