माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून झालाय. यात आरोपीस अटक केली असून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भाऊच निघाला आहे.
अनैतिक संबंधातून वाफेगाव (ता. माळशिरस) येथील ग्राम पंचायत सदस्य नंदा मोहन बनसोडे (वय ३४ रा.बनसोडे वस्ती, वाफेगाव) यांचा साडीने गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना वाफेगाव (ता.माळशिरस) येथील शेतात काल सोमवारी (ता. 19) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात मयत नंदा बनसोडे यांचा चुलत भाऊ शंकर दिगंबर सरवदे (वय २८ रा.वाफेगाव) याला अकलूजच्या पोलिसांनी अटक केली. त्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी, काल सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाफेगाव येथील शेतात नंदा बनसोडे या महिलेचा मृतदेह साडीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेचे फिर्याद मयताचे पती मोहन शंकर बनसोडे (वय ४२ रा.वाफेगाव) यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. अनैतिक संबंधाच्या कारणावरून शंकर सरवदे याने आपली पत्नी नंदा यांचा साडीने गळा आवळून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेतली.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहेत.