जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील शेतकरी नामदेव चौगुले व संतोष चौगुले तसेच चौगुले कुटुंबाला शेटफळ व सुरवड गावच्या हद्दीतील शिवे-लगत असलेला कायमचा वहिवाटी रस्त्याबाबत प्रांतअधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी संगणमत व आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचा निर्णय दिला आहे असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी केला आहे.
दि.१९ रोजी चौगुले कुटुंब इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याच्या निवेदनानुसार बसले होते. यावेळी माध्यमांची संवाद साधताना तानाजी धोत्रे म्हणाले की सदर प्रकरणाचा निकाल चौगुले कुटुंबाच्या बाजूने झाला होता. आणि तो निकाल इंदापूर तहसीलदार यांनी दिला होता. तहसीलदार यांच्या निकालाला केराची टोपली दाखवून बारामती उपविभागीय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व काटी गावचे मंडळअधिकारी मल्लापा डहाणे यांनी नवले कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून आमच्या बाजूने लागलेल्या निकालामध्ये फेरफार करून चुकीचा निर्णय दिला आहे.
अशा लबाड आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा आणि त्यांनी नवले कुटुंबाच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक देवाणघेवाणीची कसून चौकशी करावी तसेच चौगुले कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात भटक्या समाज संघटनेच्या माध्यमातून तीव्र आणि उग्र असे आंदोलन करण्यात येईल. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे सदरचे दोन अधिकारी व संबंधित विभाग जबाबदार असेल असा इशाराही तानाजी धोत्रे यांनी दिला आहे.
यावेळी अनिल पवार (प्रदेश उपाध्यक्ष वडार पॅंथर संघटना), रिपब्लिकन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे, सोमनाथ पवार- भटका समाज संघटना उपाध्यक्ष, वडार समाजाचे युवा नेते दुर्गा शिंदे, पिंटू घोडके, ॲड चौगुले, प्रकाश चौगुले, मेजर भाळे यांच्यासह शेकडो वडार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट:-
जी केस बंद झाली आहे ती केस पुन्हा उकरून काढून जाणून-बुजून प्रांतअधिकारी व मंडल अधिकारी हे चौगुले कुटुंबाला नाहक त्रास देत आहेत. तसेच इंदापूर तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयानुसार सदरचा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात यावा असा आदेश दिला असताना व आम्ही पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरले असताना. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध असताना प्रांताधिकारी व मंडळ अधिकारी यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून चुकीचा निर्णय दिला आहे. जर आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात यापुढे आम्ही जो निर्णय घेऊ तो टोकाचा निर्णय असेल.
....अनिल पवार (प्रदेश उपाध्यक्ष वडार पॅंथर संघटना)