पशुधनाचे आरोग्य संरक्षणासाठी कृती गट स्थापन करण्याची मागणी वैजापूर: देशभरात पशुपालकांची अक्षरश झोप उडवलेल्या लम्पी या जीवघेण्या त्वचाविकारापासून स्थानिक पातळीवर पशुधनाची आरोग्य सुरक्षेसाठी प्रभावी कृती गट स्थापन करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांनी तालुका प्रशासनाकडे केली . गलांडे यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या दालनात पशुधनाचे लम्पी संसर्गजन्य आजारापासून संरक्षण आणि मतदारसंघातील काही गावात अचानकपणे झालेल्या अतिवृष्टी वादळामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले . नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला देण्यासाठी कारवाई करावी या मागणीसाठी भेट घेऊन चर्चा केली . लम्पी आजाराने सर्वत्र थैमान घातल्यामुळे पशुपालकांत मोठी भीती निर्माण झाली आहे . गाय , बैल , शेळी , मेंढी व इतर पाळीव प्राणी त्वचाविकारामुळे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या आजाराचा फैलाव होण्यापूर्वीच प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली . प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्याची मागणी केली . शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या तोकडी असल्यामुळे लसीकरणासाठी खासगी डॉक्टरांचीदेखील मदत घ्यावी , अशी सूचना केली . मनसेचे तालुकाप्रमुख सुनील गायकवाड , बाळासाहेब जानराव , बाजार समितीचे संचालक सुरेश अल्हाट , राजू गलांडे , योगेश मोहिते , नवनाथ गायकवाड , सुधाकर शेळके , अप्पासाहेब काळे उपस्थित होते .