मुंबई:-शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेले नाही. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार याचा पेच कायम आहे.
तर, दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून पर्यायी जागांचादेखील शोध घेतला जात आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर मेळावा घेता यावा यासाठीदेखीळ अर्ज करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये कोठेच परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची आयडिया वापरून यंदाचा दसरा मेळावा गाजवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
म्हणून मुंबई पालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. सध्या हा वाद सुप्रीम कोर्टात असून, यावर निर्णय येणे प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे निर्णय काहीही आला तरी शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर एकत्र जमा असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे जरी शिवाजी पार्क शिवसेनेला मिळाले नाही तरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने या परिसरात जमा होऊ शकतात.
बाळासाहेबांची आयडिया काय?
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभा गाजलेल्या आहेत. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी टॅक्सीवर उभं राहून भाषण केले होते असे सांगितले जाते. त्यामुळे जर शिवाजी पार्कवर कोणताही ठोस निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरेदेखील अशाच पद्धतीने भाषण करू शकतात, अशी शक्यता आहे.
तर, न्यायालयाची पायरी चढणार
'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्कचा हा गोंधळ आणखी वाढला तर शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे. महापालिकेने जर प्रकरण ताणलं तर थेट मैदानात जाऊन मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.