रिपरिप पावसाने कापसीच्या कैऱ्या सडल्या
"यंदा पाचोड परिसरात शेतकऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात जाण्याची भिती"
पाचोड(विजय चिडे) पाचोडसह परीसरामध्ये आँगस्ट महिन्यापासून एकही नक्षत्र रिकामे गेले नसल्याने खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था होतं आहे. पावसात भिजलेल्या कापशीच्या कैऱ्याना, तसेच धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत संकट कोसळणार असल्याचे दिसून येत आहे.
नूकतेच काही दिवसावर दसरा आला आहे.पाचोड परिसरातील मुरमा,कोळीबोडखा,थेरगाव,हर्षी
,सोनवाडी,दादेगाव,वडजी,लिबगाव,दांडगा राजगाव सह आदी गावातील कापूस हा दसराला येणार असून याच कापसावर दिवाळी साजरी करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांचे यंदा अक्षरश: दिवाळे निघणार आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैऱ्या तसेच बोंड कुजले आहे.त वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. मात्र प्रत्यक्षात पाऊस थांब नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाचे फुल गळून पडू लागले आहेत.तर खालील फांद्यावर असणाऱ्या सरकीलाही आता कोंब फुटले आहेत.बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एक बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे.
सध्या बाजरी,मुग,सोयबिन परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून, डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी बाजरी,सोयबिन काढुन ठेवली. मात्र जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवत आहे. शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट-आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कापसाला तसेच मका, बाजरी कणसांना कोंब फुटले आहेत. यंदा निसर्गाने भरभरून दिले होते, पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.नुकसानग्रस्तांना सरसकट शासकीय मदत देण्याची गरज आहे.
धनराज भुमरे(शेतकरी, पाचोड)