परभणी(प्रतिनिधी)येथील श्रीराम नगरातील रहिवासी ज्ञानोबा सोपानराव मोहिते (वय 59 वर्षे), एक वर्षापूर्वीच पाटबंधारे विभाग जायकवाडी, परभणी येथून स्टेनो पदावरून सेवानिवृत्त झाले. नुकतीच त्यांंच्यावर रुबी हॉल पुणे येथे 4 ऑगस्ट 2022 रोजी तिसर्यांदा ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. यावेळी त्यांना तिसर्यांंदा जीवनदान मिळाले आहे.
रुबी हॉल रुग्णालयातील विख्यात ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ.अशोक कानेटकर, डॉ.आशिष खनजू, डॉ.मखले, डॉ.मलिक, डॉ.हिरेमठ इत्यादी हृदयरोग तज्ज्ञांची टीम, रुग्णालय प्रशासन यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ज्ञांशी सल्लामसलत करून अत्यंंत कठीण अशी एकाच रुग्णावर तिसर्यांदा ओपन हार्ट सर्जरी अथक प्रयत्नांनी यशस्वी केली. एकाच रुग्णावर तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागणे ही अत्यंत अवघड आणि दुर्मिळ केस होती, त्यात परमेश्वराने आम्हाला यश दिले अशी भावना डॉ. अशोक कानेटकर आणि डॉ. आशिष खनजू यांनी व्यक्त केली. ही शस्त्रक्रिया तब्बल 9-10 तास चालली.
ह्यापूर्वी मोहिते ह्यांच्यावर 1997 साली वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ओपन हार्ट सर्जरी, वॉल ओपनिंग करावी लागली. त्यानंतरही संकट त्यांची पाठ सोडेना, पुन्हा 2017 साली वयाच्या 34 व्या वर्षी दुसर्यांदा ओपन हार्ट सर्जरी, वॉल रीप्लेसमेंट करावी लागली.
मोहिते हे नियमित आरोग्य तपासणीसाठी जून 2022 मध्ये रुबी हॉल रुग्णालय पुणे येथे गेले असता तेथील हृदयरोग तज्ञांनी तात्काळ पुन्हा एकदा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते असा सल्ला दिला. यामुळें मोहिते कुटुंबियांना मोठा धक्का बसला. तसेच रुग्णालयाने सुमारे तीस लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितल्यामुळे मोहिते यांच्या सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबियापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. परंतु अशा संकटाच्या प्रसंगी त्यांचे मित्र, सहकारी, हितचिंतक, शेजारी, नातेवाईक यांच्याकडून आर्थिक मदत व उसनवारी करून त्यांनी पैसे उभे केले.
रुबी हॉल पुणे येथील हृदयरोग तज्ञ यांचे ज्ञान, कौशल्य, परिश्रम, आपुलकीने मोहिते कुटुंबिय भारावून गेले. सर्व डॉक्टर त्यांंच्या कुटुंबियांसाठी साक्षात देवदूतच ठरले अशी भावना ज्ञानोबा मोहिते व कुटुंबीयांनी व्यक्त केली. सर्व डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, मित्र, नातेवाईक, हितचिंतक, सहकारी, शेजारी यांनी केलेल्या मदतीमुळे मोहिते कुटुंबीय त्यांचे ऋण व्यक्त करतात.
रुबी हॉल रुग्णालय पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अशोक हिरेमठ आणि हृदयरोग तज्ञ डॉ.आशिष खणजू यांचे ज्ञानोबा मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्ष भेटून ऋण व्यक्त केले.
तातडीची गरज आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहिते कुटुंबियांनी उसनवारी करून पैसा उभा केला. परंतु तो परत कसा करायचा असा गंभीर आर्थिक प्रश्न मोहिते कुटुंबियांसमोर आहे, अशा प्रसंगी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत व्हावी असे आवाहन मोहिते कुटुंबियांनी केले आहे.