औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत ‘रन फॉर युनिटी’ दौड घेण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत औरंगाबादकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये मोठ्या उत्साहाने धावले. यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या औरंगाबादकरांनी मोठा सहभाग नोंदविला. विभागीय क्रीडा संकुल येथून दौडला सुरुवात झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते एकतेची मशाल पेटविल्यानंतर रन फॉर युनिटी दौडला प्रारंभ झाला. याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा चौक, गजानन महाराज मंदिर चौक व पुन्हा त्याच मार्गाने दौड विभागीय क्रीडा संकुलात गेल्यानंतर समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्वतः या दौडमध्ये सहभाग नोंदविला. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित करण्यात आली. आठ वर्षाच्या मुलापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकणार नाही, अशा प्रकारचा संदेश या दौडच्या माध्यमातून दिला.'रन फॉर युनिटी' हे एक माध्यम असून सर्वांनी एकसंघ होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. तसेच असे उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी जाहीर केले