दिव्यांगांच्या उत्तम पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या आदर्श केंद्रांमध्ये शहरातील अपंग जीवन विकास संस्थेद्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निवड झाली असून राज्यातील एकमेव आहे.देशभरातून निवड झालेल्या आदर्श केंद्रांचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले. अमरावती शहरातील नवाथे नगर परिसरात यानिमित्ताने आज सकाळी आयोजित सोहळ्यास जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंडा, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, केंद्राचे अध्यक्ष किशोर बोरकर आदी उपस्थित होते. दिव्यांगांना सशक्त व सक्षम करून त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडणाऱ्या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांना 'आदर्श केंद्रा'चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यात या केंद्राची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व केंद्रप्रमुखांशी यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे संवाद साधला. दिव्यांग व्यक्ती ही समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता यावे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी संवेदनशीलतेने करावी असे आवाहन, डॉ. कुमार यांनी आपल्या संवादात केले.

श्रीमती कौर यांनी दिव्यांग कक्षातील विविध साधने, उपकरणांची पाहणी केली. अद्ययावत उपकरणांचा लाभ सर्व दिव्यांगांना घेता येईल असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्यावतीने पंचायत समिती स्तरावर दिव्यांग निवारण कक्षाची उभारणी करण्यात आली असून त्याचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे श्री पंडा यांनी यावेळी सांगितले.