औरंगाबाद:जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात पावसाने संततधार लावली आहे . नगर , नाशिक जिल्हांतील सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत . भंडारदरा , मुळा , गंगापूरसह नऊही धरणांतून लाखो क्युसेक्सचा विसर्ग करण्यात येत आहे . त्यामुळे जायकवाडीत पाण्याचे महाकाय लोटे दाखल होत आहेत . गेल्या तीन आठवड्यांपासून नाथसागरचे दरवाजे सताड उघडे आहेत . सध्या गोदापात्र तुडुंब भरलेले आहे . जायकवाडांच्या पुढे बांधण्यात आलेले ११ बॅरेजेस तसेच माजलगाव आणि विष्णुपुरीही पूर्ण क्षमतेने भरले आहे . जायकवाडीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने शनिवारी सकाळी ७ वाजता द्वार क्रमांक १ ते ९ फूटभर उचलण्यात आले . त्यानंतर काही वेळातच नऊ दरवाजे अडीच फुटांनी उपडण्यात आले . याशिवाय गेट क्रमांक १० ते २७ असे एकूण १८ दरवाजे तब्बल ४ फुटांनी उपडलेले आहेत . या सर्व २७ दरवाजांतून एकूण ९९ हजार ३६ क्युसेक्सने जलप्रवाह नव्याने गोदावरीत सोडला जात आहे . सर्व २७ दरवाजे उपडल्यानंतर शहरातील ८ नाल्यांचा फुगवटा वाहून नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे . जलसंपदा , नगर परिषद , सार्वजनिक बांधकाम विभाग , पंचायत समिती व अन्य प्रशासकीय विभाग याबाबत उदासीन आहे . आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल . नदीकाठच्या जनतेने सतर्क रहावे , असे आवाहन जलसंपदा विभागाच्या जायकवाडी उत्तर येथील कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव , सहायक अभियंता अशोक चव्हाण कनिष्ठ अभियंता विजय काकडे यांनी केले आहे .