विठ्ठलवाडी तील भीमा नदीवरील बंधारा गेला पाण्याखाली

( तळेगाव ढमढेरे वार्ताहर ) गेली आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने भीमा नदीवरील खेड, शिरूर, हवेली, दौंड या चार तालुक्यातील १८ बंधारे काल रात्रीपासून दुथडी भरून वाहत असताना शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेला असल्याने तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

                    विठ्ठलवाडी ता. शिरूर येथे यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा विठ्ठलवाडी, सांगवी सांडस दरम्यानचा भीमा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने बंधारा वरील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दौंड, हवेली, शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.भामा आसखेड व चासकमान धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस अद्यापही सुरू असल्याने व ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होत आहे.तसेच इंद्रायणी नदीचा ही विसर्ग याच नदीत होत असल्याने पुन्हा भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने खेड, हवेली, शिरूर ,दौंड तालुक्यातील १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चासकमान धरणातून तसेच भामा आसखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग काल सायंकाळपासून करण्यात आलेला असल्याने भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.