औरंगाबाद:- दि.१६ स.(दीपक परेराव)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे निमित्ताने दिनांक १७ व १८ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने "प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळावा" शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे सकाळी ९:३० वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. याचप्रमाणे या मेळावा ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी मंगल प्रभात लोढा, मा.मंत्री, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालविकास विभाग यांच्यासह डॉ.भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, संदीपान भुमरे मंत्री,रोहयो, अतुल सावे, सहकार मंत्री , अब्दुल सत्तार,मंत्री कृषी, श्रीमती. मनिषा वर्मा, प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, आणि दीपेन्द्र सिंह कुशवाह, मा. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांच्यासह विविध उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महारोजगार मेळाव्यात खालील प्रमाणे कार्यक्रमाचा समावेश आहे:
१. महारोजगार मेळावा : या महारोजगार मेळाव्यामध्ये बजाज ऑटो लि., एनआरबी बेअरींग प्रा.लि., फोर्ब्स अॅन्ड कंपनी लि., अजंता फार्मा लि., पॅरासन मशिनरी इंडिया प्रा. लि., अजित सीड्स प्रा. लि., न्युट्रीविडा न्युट्रास्युटिकल्स, नवभारत फर्टीलायजर, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि., लुमीनाज सेफ्टी ग्लास प्रा.लि., लक्ष्मी मेटल प्रेसींग वर्क प्रा.लि., लक्ष्मी रिक्षा बॉडी पार्ट प्रा.लि., रत्नप्रभा कार्स प्रा.लि., मायलन लॅबॉरेटरीज, व्हेरॉक इंजिनीअरींग लि., पित्ती इंजिनीयरींग लि., ग्राइंड मास्टर मशीन इंडिया, प्रा.लि, गुडइयर साऊथ एसिया टायर्स प्रा. लि., पर्किन्स इंडिया प्रा.लि., इत्यादी औरंगाबाद जिल्हयातील २९ नामांकित कंपन्या सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या २२८३ संधी उपलब्ध आहेत.
२. अॅप्रेंटिसशीप मेळावाः औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षांचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरीता धुत ट्रान्समिशन, प्रा. लि., इन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा.लि, रूचा इंजिनिअरींग प्रा. लि., परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि., निल मेटल प्रोडक्ट, लि यांसारख्या एकूण ६४ नामांकित कंपन्या शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत ३०२० अप्रेंटीसशिपची पदे उपलब्ध आहेत.
अशा प्रकारे विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार महारोजगार मेळाव्यामध्ये एकूण ५३०३ रिक्तपदे उपलब्ध आहेत.
३. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारे महामंडळाचा सहभाग: या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरीता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारे विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार असून याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.