मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव

विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार

                                               - कृषी मंत्री अब्दुल सत्तार 

 जालना, दि. 17 :- निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन आज 17 सप्टेंबर रोजी आपण 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहोत. संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांनी हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे आज मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

            यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ज्ञानोबा बानापुरे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये, तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  

            सर्वप्रथम कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व शोकधून वाजवुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.

            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले. मराठवाडयातील थोरामोठयांनी या संग्रामात फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली. सर्वस्तरावर निजामाशी मुकाबला करुन, पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यावेळेच्या क्रांतीकारी पिढीने यशस्वी जबाबदारी पार पाडली म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत असुन या वीरांनी प्रेरणादायी व स्फुर्तीदायी लढा दिला त्यापासुन सर्वांनी बोध घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचेही श्री. सत्तार यावेळी सांगितले.          

            यावेळी टाऊन हॉल परिसरात प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामात लढा दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती असलेल्या सचित्र प्रदर्शनास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत प्रदर्शनाची पहाणी केली. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची त्यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

-*-*-*-*-*-*-*-