नांदेड : किनवटच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आदिवासी मुलींच्या नोकरी आणि शिक्षणासाठी पुढाकार घेतला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून किनवटला घेतलेल्या शिबिरात तब्बल ४१० मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.आदिवासी जमातीच्या विकासासाठी या कार्यालयामार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्यात प्रामुख्याने निवासी आश्रमशाळा व मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला गेला आहे. या मुलींना आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या दृष्टीने प्रकल्प संचालक पुजार यांनी वेगळा विचार केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून या मुलींना विकासाच्या प्रवाहात घेता येईल का याची चाचपणी केली. कंपनीच्या मानव संसाधन विभागाने याला तत्काळ प्रतिसाद देत किनवट येथे आपली स्वतंत्र टिम पाठवून दोन दिवस निवड शिबीर घेतले. या शिबिरात तब्बल ४१० मुलींना नोकरीची संधी मिळाली आहे.