हरियाणा: हरियाणा राज्यातील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असुन एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला ठेवल्यानंतर तिच्यावर मालकांनी ग्राहकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. रोज जवळपास १० ते १५ पुरुष तिच्यावर बलात्कार करत होते.मुलीने हिंमत दाखवून कामाला जाणे बंद केले. त्यानंतर स्पा मालक तिला फोन करू लागला. तिला स्पामध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. तिच्या पालकांना यात काळेबरे वाटल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर प्रकरण बाहेर आले. 

या पिडीत मुलीने तक्रारीत सांगितले, की एका ओळखीच्या महिलेकडे पैशांची गरज असल्याने कुठे नोकरी असेल तर सांगा, असे सांगितले होते. महिलेने मुलीला तिच्याच नातेवाइकाच्या मालकीच्या स्पामध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी असल्याचे सांगितले. मुलीने नोकरी करण्याची तयारी दर्शवल्याने तिला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवण्यात आले. मात्र नोकरीच्या पहिल्या दिवशी तिला एका खोलीत बोलावून एका पुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. या घाबरलेल्या मुलीने घरगुती कारणास्तव नोकरी सोडणार असल्याने सांगितले. तेव्हा मालकाने तिला लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ दाखवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी आणखी ४-५ दिवस स्पामध्ये नोकरीला गेली.

परंतु रोजच तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याने मुलीने हिंमत करून नोकरीला जाणे बंद केले. त्यामुळे नोकरीला लावून देणारी महिला आणि स्पा मालक तिला सतत फोन करू लागले. तसेच त्यांनी तिला ब्लॅकमेल करत हॉटेलमध्ये नेऊन मारहाण केली. मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे मुलीच्या पालकांना यात काळेबेरे वाटल्याने त्यांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिला आणि इतर जण अल्पवयीन मुलीला अडकवण्यासाठी वेश्याव्यवसायात भाग पाडण्याचं काम करत असल्याचे पोलिसांच्या समोर आले. त्यामुळे या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे.