बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आलेले मेन गेट कर्तव्यदक्षतेची चुणूक अल्पावधीतच दाखवून देणारे तहसीलदार सुहास हजारे यांनी काही दिवसांपूर्वी उघडले. यामुळे कार्यालयात येणाऱ्यांची मोठा हेलपाटा मारण्यापासून सुटका झाली. परंतु याच तहसीलच्या मेनगेट सह दुसर्या गेट समोरील नाली गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. मात्र याकडे आजपर्यंत कोणत्याही तहसीलदाराने लक्ष दिले नाही. आता निदान सुहास हजारे यांनी याकडे जातीने लक्ष देऊन दोन्ही गेट समोरील नाली बनवून त्यावर स्लॅब टाकायला लावावा, साईड पंख्यापासून दोन्ही गेट पर्यंत काँक्रीटीकरण करून घ्यावे, लोकांचे तहसील कार्यालयात येणे-जाणे सुसह्य करावे. अशी मागणी मुक्त पञकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, तहसील कार्यालयाच्या दोन्ही गेट समोरील नालीचे पूर्णतः बारा वाजल्याने तहसील कार्यालयासमोरील अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. मेनगेट च्या आजूबाजूला लहान-सहान उद्योग करणाऱ्यांनी तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्यांसाठी तुटलेल्या नालीवर साधारण दीड ते दोन फुटाची काँक्रीटची शिळा ठेवली आहे. मात्र दिवसभर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांची व शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या पाहता ही शिळा किती तग धरणार ? हा प्रश्नच आहे. जिल्ह्यासारख्या ठिकाणी बीड तालुक्याचे कार्यालय असलेल्या तहसील सारख्या कार्यालयासमोरची अशी दुरावस्था शोचनीय आहे. सध्याची दोन्ही गेट समोरील दुरावस्था पाहता दोन्ही गेट समोरील नाली बनविणे जसे आवश्यक आहे तसे नालीवर स्लॅब टाकणे, दोन्ही गेट समोरील साईड पंख्यापासून गेट पर्यंत काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. शिळा तुटली किंवा नालीत पडली तर अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तरी तहसीलदार सुहास हजारे यांनी तहसील कार्यालयासमोर कोणतीही दुर्घटना घडण्याअगोदर नाली चांगली बनवून घेणे, नाली वर स्लॅब टाकणे, साईड पंख्या पासून ते दोन्ही गेटपर्यंत काँक्रिटीकरण करून घेणे आवश्यक आहे. ही कामे लवकरात लवकर करण्यात यावीत. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे.