मुंबई: राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही.आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे.

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, त्यानंतर ऑक्टोबर भरती प्रक्रियेला सुरवात होईल. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.