पालोदचा खेळणा मध्यम प्रकल्प ७० टक्के भरला सिल्लोडचा पाणीप्रश्न मिटला सिल्लोड | दोन दिवस झालेल्या पावसामुळे सिल्लोड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खेळणा धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण ७० टक्के भरल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले . तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह डोंगरगाव , मोढा , वांगी आदी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो . तालुक्यात पावसाळा सुरू होऊन अद्यापपर्यंत मोठा पाऊस झालेला नसल्याने धरणात पाण्याची आवक कमी होती . परंतु मागील दोन दिवसांत केळगाव , मुर्डेश्वर , हट्टी , बहुली , मांडणा , लिहाखेडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खेळणा नदीला पूर येऊन धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले . परिणामी धरण ७० टक्के भरले असून आणखी पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे .