रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा उद्योग सुरुच असुन यात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईकच माथाडीच्या नावाखाली खंडणी वसुल करतात अशी धक्कादायक माहिती खात्रीलायक सूत्रांकडुन पुढे आली आहे.

शिरुर तालुक्यात सुमारे 25 वर्षांपुर्वी आशिया खंडातील पाहिली पंचंतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्यात अनेक नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपन्या आल्याने स्थानिक बेरोजगार युवकांना काही प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या. त्यात कमी शिक्षण असणाऱ्या युवकांना माथाडीत काम मिळाले. परंतु त्यानंतर येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी याच माथाडीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एमआयडीसीत आपले वर्चस्व निर्माण करत दहशत निर्माण केली.

त्यानंतर त्यांनी औद्योगिक वसाहतीत भांडण, मारामारी करुन स्वतःचे वेगवेगळे ग्रुप तयार करुन उदयास आलेल्या भाई आणि दादांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. त्यांच्याकडे असलेल्या 'मनी' आणि 'मसल पावर' मुळे विविध पक्षांनी त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या आणि या दादांना आपल्या पक्षात घेऊन अनेक राजकीय पद देऊन त्यांना राजकीय पाठबळ देत शिरुर तालुक्यात आपल्या पक्षाची ताकत वाढवली.

त्यामुळे याच राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक सध्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी माथाडीच्या नावाखाली वाहनचालकांना दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पावत्या फाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु एमआयडीसीत माल घेऊन येणारे वाहनचालक हे अनेकदा बाहेरच्या राज्यातून येत असल्याने 'नको ती डोक्याला कटकट' असे म्हणतं पोलिसांकडे जाण्याचे टाळत असल्याने या वसुली करणाऱ्या लोकांचं धाडस वाढत आहे.

माथाडीच्या पैशासाठी शिवीगाळ ...

ढोकसांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या दोन कंपन्यामध्ये या गावातील माजी सरपंच असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्याचा एक नातेवाईक गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या बनवुन वाहनचालकांना दमबाजी करुन बेकायदेशीर पैसे वसुल करत आहे. आठ दिवसांपुर्वी याच राजकीय पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाने एका वाहनचालकाला अर्वाच भाषेत शिवीगाळ करत त्याच्याकडुन जबरदस्तीने माथाडीच्या नावाखाली 'बोगस पावती' देत पैसे वसुल केल्याचा व्हिडिओ "शिरुर तालुका डॉट कॉम" च्या हाती लागला असुन संबंधित वाहनचालकाला दिलेल्या बोगस पावत्या सुद्धा "शिरुर तालुका डॉट कॉम" कडे उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता माथाडी बोर्ड याप्रकरणी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.