सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विपुल रामदास शिंदे, वय ३३ वर्षे राहणार चौपाड, दक्षिण कसबा, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये १३ सप्टेंबर २०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.
विपुल रामदास शिंदे हा मागील अनेक वर्षोपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून नवीपेठ, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, नवी वेस पोलीस चौकी, शिंदे चौक चौपाड, पारस इस्टेट, लकी चौक, दत्त चौक या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरुन जबरी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत / गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, धमकी देणे, मारामारी करणे, विनयभंग करणे, शस्त्रानिशी फिरुन हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन विपुल रामदास शिंदे याने परिसरात दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करुन स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.
विपुल रामदास शिंदे याचे विरुध्द शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यास एकूण ०७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती.
विपुल रामदास शिंदे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने पोलीस उप-आयुक्त परिमंडळ, सोलापूर शहर यांचेकडील आदेशानुसार सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालूका, उस्मानाबाद जिल्हयातुन तडीपार आदेशाचा भंग करुन सोलापूर शहर हद्दीत प्रवेश करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे. विपुल रामदास शिंदे याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त, डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची चौथी व या वर्षातील आठवी कार्यवाही आहे.