बीड, दि. 31 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१जुलै २०२२ असा होता. मात्र, दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे, केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत नमूद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे. याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील 10 पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबी करिता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
पीक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स, जमिनीचा 7/12 उतारा स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतक-याचा करारनामा.