योजनेत जालना जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील 37 गावांची निवड

 अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये 

जालना जिल्हा अग्रस्थानी राहण्यासाठी विहित वेळेत कामे पुर्ण करा 

- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना, दि. 14 (जिमाका):- अटल भूजल योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमासाठी जालना जिल्ह्यातील 37 गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन या गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांबरोबरच नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम करण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जालना जिल्हा अग्रस्थानी राहील यादृष्टीने कामांचे काटेकोर नियोजन करत प्रत्येक विभागाने त्यांना ठरवून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अटल भूजल योजनेंतर्गत विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. 

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, वरिष्ठ भू वैज्ञानिक के.एस. कांबळे, सहाय्यक भू वैज्ञानिक डॉ. सी.डी. चव्हाण, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एच. झुरावत, तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह जालना, परतुर व घनसावंगी तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, अटल भूजल योजनेंतर्गत जालना जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील 37 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जालना तालुक्यातील 8 गावे, घनसावंगी तालुक्यातील 15 तर परतूर तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. मार्च, 2025 पर्यंत या योजनेंतर्गत कामे पुर्ण करावयाची असुन दरवर्षी देण्यात आलेले उद्दिष्ट त्याच वर्षात पुर्ण होण्याच्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश आदी प्रशासकीय बाबी वेळेत पुर्ण कराव्यात. अटल भूजल योजनेच्या माध्यमातुन जलसंधारणाच्या कामांबरोबरच मग्रारोहयोच्या माध्यमातून गावातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्यादृष्टीने कामे करण्यात येणार असल्याने तालुकास्तरीय यंत्रणांनी अतिशय गांभिर्याने या योजनेच्या कामाचे काटेकोरपणे नियोजन करत दर्जेदार, गुणवत्तापुर्ण व विहित वेळेत ही कामे पुर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून विहिरीत आडवे बोअर घेणे, दगडी बंधारा, नाला खोलीकरण, मातीनालाबांध, विहिर पुनर्भरण, शेत बांध बंदिस्ती, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, सिमेंट नाला बांध, शोषखड्डे, पावसाच्या पाण्याचे संकलन, सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, ओढ्यातील गाळ काढणे, भूमिगत बंधारा, ट्रॅच कम रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज शाफ्ट,ठिबक, तुषार, फळबाग लागवड, मल्चिंग, वृक्ष लागवड, शेडनेट यासह इतर कामे करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.