शिरुर: लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असुन शिरुर तालुक्यातील 13 गावात काही गायी व म्हशीनां या रोगाचा संसर्ग झाला असुन ज्या गावात संसर्ग झाला आहे त्या गावच्या आसपास 5 किलोमीटर त्रिज्येच्या परीसरात असणाऱ्या सर्वच जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यासाठी 28 हजार लसी प्राप्त झाल्या असुन 30 ते 35 जणांची टीम युद्ध पातळीवर लसीकरणाचे काम करत आहे. येत्या दोन दिवसात हे काम पुर्ण होईल अशी माहिती पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी नवनाथ पडवळ यांनी दिली.
शिरुर तालुक्यात लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लस जास्तीस जास्त प्रमाणात उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी जिल्हा परीषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ शिवाजी विधाटे यांची मंगळवार (दि 13) रोजी भेट घेऊन केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात या लसी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजाराने देशात धुमाकूळ घातला असुन गाय व म्हैस या जनावरांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने फैलावत आहे. महाराष्ट्रात लम्पी स्कीन हा नियंत्रणात असला तरी ग्रामीण भागात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाबद्दल काही अफवाही पसरत आहेत. जनावरांच्या दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा पसरल्याने दूध पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासून माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता दुध नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात असुन नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.
नक्की काय...? आहे लम्पी स्कीन आजार
लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नागरिकांनी काय...? काळजी घ्यावी
लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
शिरुर तालुक्यातील गोलेगाव, करडे, न्हावरे, मांडवगण फराटा, कुरुळी, दरेकरवाडी, शिक्रापुर, करंदी, केंदुर, धामारी, मुखई, पाबळ आणि कवठे येमाई या 13 गावात सध्या जनावरांना लसीकरण चालु असुन या गावांच्या 5 किमी त्रिज्येच्या परीसरात असणाऱ्या सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शिरुर तालुका पशु चिकित्सालय येथील डॉक्टर आणि तालुक्यातील 24 पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी मिळुन 30 ते 35 जणांची टीम तसेच काही खाजगी डॉक्टर यांच्या मदतीने लसीकरण चालू असुन शिरुरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ आज (दि 14) रोजी याचा आढावा घेणार आहेत.
तसेच लम्पी स्कीन या आजारा संदर्भात शिरुर तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत धर्माधिकारी, गटविकास अधिकारी अजित देसाई, सहायक गटविकास अधिकारी रामचंद्र जगताप यांच्या उपस्थितीत आज (दि 14) रोजी शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच आणि शिरुर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक होणार आहे.