परभणी(प्रतिनिधी )जिल्हाभरात अतिवृष्टी व पूरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतकर्‍यांना ताबडतोब सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी (दि.12) जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षीच्या जूलै महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होवून शेतकर्‍यांच्या तूर, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यात पुन्हा जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली. त्यामुळे उरलीसुरली पिकेही वाया गेली. त्यातून शेतकर्‍यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. परंतु, कृषि आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकर्‍यांना वगळ्ल्याने ते आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे खा.जाधव यांनी यावेळी सांगितले. अतिवृष्टी व पूराने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा या प्रश्‍नावर शिवसेना संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, मंगलताई कथले, ज्ञानेश्‍वर पवार, मुंजा कदम, जितेश गोरे, कृष्णा पिंगळे, बालाजी दहे, मिनल कदम, नवनाथ देशमुख, राहुल पाटील, आप्पा बनसोडे, सुनील पंटरकर, विकास वैजवाडे, शुभम पाष्टे, पांडुरंग शिंदे, गोकुळ लोखंडे, रविंद्र धर्मे, प्रभाकर खंदारे, संतोष गवळी, सत्यनारायण घाटूळ, माणिकराव काळे, अशोक वाघ यांच्यासह अन्य उपस्थित होते.