परभणी(प्रतिनिधी)परभणी येथून हिंगोलीस स्थलांतरीत करण्यात आलेले आयकर कार्यालय पुन्हा परभणी येथे तात्काळ सुरू करण्यात यावे असे आदेश पुणे येथील आयकर विभागाचे प्रिंसीपल चिफ कमिशनर प्रविण कुमार यांनी काढले आहेत.

विशेष म्हणजे मे महिन्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी परभणीतून स्थलांतरीत करण्यात आलेले आयकर कार्यालय लवकरच परभणीत परत कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले होते.परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा तात्काळ सुरू करण्याचे आदेश निघाल्याने डॉ.क़राड यांनी परभणीकरांना दिलेल्या आश्वसनाची पुर्तता केली असून याबद्दल परभणी कर सल्लागार संघटनेत समाधान व्यक्त होत आहे़.

परभणी येथे १९६३ पासून सुरू असलेले आयकर कार्यालय बंद करून ते हिंगोली येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे परभणी येथे स्वत:च्या इमारतीत आयकर कार्यालय सुरू असताना हिंगोली येथे किरायच्या इमारतीत हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले होते. यामुळे परभणी जिल्ह्यातील करदाता, कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउटंट यांना हिंगोली येथे जावून या कार्यालयाशी संबंधित कामकाज करण्यास अनेक अडचणी येत होत्या.

या पार्श्वभुमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.राजकुमार भांबरे यांनी औरंगाबाद येथे दिनांक २१ मे २०२२ रोजी भेट घेवून हिंगोली येथे स्थलांतरीत झालेले आयकर कार्यालय पुन्हा परभणीत स्थापन करण्याची विनंती केली होती. यावेळी डॉ.क़राड यांनी परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यावेळी झालेल्या चर्चेनुसार डॉ.क़राड यांनी परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा परभणीत सुरू करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. डॉ.कराड यांनी वरीष्ठ पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा परभणीत सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे़. तसेच या संदर्भात पुणे येथील आयकर विभागाचे प्रिंसीपल चिफ कमिशनर प्रविण कुमार यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी परभणी येथील आयकर कार्यालय तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे डॉ. कराड यांनी आयकर सल्लागार संघटनेला दिलेला शब्द पाळला असून याबद्दल परभणी जिल्ह्यातील आयकर दात्यांसह, कर सल्लागार व चार्टड अकाउंटट, व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे़.याबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ़भागवत कराड यांचे कर सल्लागार संघटनेने आभार व्यक्त केले आहेत.