औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी यांनी महाराष्ट्रातील विज्ञान विषयक व्यासपीठ निर्माण करून देणारा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या प्रेरणेतून,शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती आशा गरुड आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनुनकर,दीपक शिंदे, महेश शेवाळकर,शिवाजी गोजरटे आणि संजय पक्वान्ने या शिलेदारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना हक्काची स्वतःची प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी 2019 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली चला शिकूया प्रयोगातून विज्ञान हा उपक्रम जिल्हाभरात सुरू झाला.या उपक्रमामध्ये इयत्ता तिसरी ते आठवी या वर्गातील पाठ्यपुस्तकातील प्रयोगांची निवड या टीमच्या मार्फत केली जाते. त्यानंतर टीमव्दारे स्क्रिप्ट रायटिंग करून जिल्हा परिषदेच्या नियुक्ती केलेल्या समितीला दाखवले जाते. परभणी 90.8 एफ.एम.च्या माध्यमातून दर शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शनिवारच्या प्रयोगाचे साहित्य वूई लर्न इंग्लिश या कार्यक्रमाच्या शेवटी सांगितले जाते. तसेच पीडीएफद्वारे व्हाट्सअपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना पोचवले जाते. दर शनिवारी परभणी 90.8 एफ.एम. च्या माध्यमातून ही टीम निवडक विद्यार्थ्यांसहित प्रयोगाची सादरीकरण जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ऐकवले जाते. शिक्षकाच्या मदतीने सर्व विद्यार्थी प्रयोग करतात.विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सृजनशील विचार,परिसर निरीक्षण कौशल्यांचा विकास होऊन येणाऱ्या काळामध्ये देशात सक्षम शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची वेळोवेळी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा गुणवत्ता कक्षाचे सदस्य कैलास सुरवसे यांनी दिली आहे.