मिडीयावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून खारघर मधील विवाहितेकडून तब्बल १२ लाख ५८ रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळून सदर विवाहितेला धमकावून तिच्याकडून आणखी रोख रक्कम घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जेरबंद केले आहे.

नवीन श्यामदेव कश्यप (२४) असे या खंडणीखोराचे नाव असून मागील काही महिन्यापासून तो सदर विवाहितेला त्रास देत होता.

सदर घटनेतील २५ वर्षीय विवाहिता खारघरमध्ये आपल्या कुटुंबियासह राहण्यास आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या विवाहितेची मिनाक्षी नामक महिलेसोबत इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. त्यानंतर या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री झाल्यानंतर मिनाक्षीने तक्रारदार विवाहितेला आपले अश्लिल फोटो पाठवून तिच्याकडून तिचे अश्लिल फोटो मागवून घेतले.

त्यानुसार या विवाहितेने देखील मिनाक्षीला आपले नग्न अवस्थेतील फोटो पाठवून दिले. मात्र, त्यानंतर मिनाक्षीने या विवाहितेचे आश्लिल फोटो तिचे मित्र सचिन मिना आणि नवीन कश्यप या दोघांना पाठवून दिले. त्यानंतर सचिन आणि नवीन या दोघांनी सदर विवाहितेला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर या दोघांनी सदर विवाहितेसोबत मैत्री केली. काही महिन्यांपूर्वी आरोपी नवीन कश्यप नवी मुंबईत खारघर येथे तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने विवाहितेला कोल्ड्रींक्स मधून नशेचे पेच पाजून तिच्यासोबत अश्लिल चाळे करतानाचे फोटो काढून घेतले. त्यानंतर नवीन कश्यप याने त्याच्या सोबतचे अश्लिल फोटो आणि मिनाक्षीने पूर्वी त्याला दिलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिल्याने सदर विवाहितेने घाबरुन आपल्या पतीला याबाबत माहिती न देता घरातील सर्व दागिने नवीन कश्यपला देऊन टाकले.