जिंतुर तालुक्यातील आडगाव जि. प. सर्कलमधील जनतेच्या प्रमुख समस्यांसह जिंतूर-औंढा महामार्गात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लोकशाही मार्गाने रास्तारोको आंदोलन छेडू असा गंभीर इशारा माजी जि.प. सदस्या अरुणा काळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग जिंतुर ते औंढा नागनाथ हा रस्ता मृत्युचा सापळा झालेला आहे. या रस्त्यावर दररोज भरपुर अपघात होतात त्यामुळे बऱ्याचशा नागरीकांचा मृत्यु झालेला आहे. तसेच मौजे भुसकवडी या गावाला स्वातंत्र्यापासून रस्ता नसल्यामुळे तेथील नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेथील नागरीकांनी रस्ता नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता. तेथील नागरीकांनी विविध प्रकारची आंदोलने, उपोषणे केलेली आहेत. तरी प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. सदर बाब अतिशय गंभीर असून तो रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर वीज वितरण बाबतीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये सामान्य नागरीक व शेतकरी होरपळुन निघत आहे. म्हणून जिंतुर ते औंढा रस्त्यावरील खड्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. भुसकवडी फाटा ते भुसकवडी ग्रामीण मार्गास मंजुरी द्यावी. आडगांव ते टाकळखोपा श्रीरामवाडी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात यावी. आडगांव (बा) व इटोली मसोबा सबस्टेशन येथे 5 एमव्ही चे ट्रान्सफार्मर तात्काळ मंजुर करावे. ह्या प्रमुख मागाण्यांसह सर्कलमधील इतर गंभीर समस्या त्वरित मार्गी लावाव्यात अन्यथा 17 सप्टेंबर रोजी आडगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी जि.प. सदस्या अरूणा काळे,अविनाश काळे, राजाभाऊ नागरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.