परळी (प्रतिनिधी) राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.इंदुरीकर महाराज काल कार्यक्रम सुरू होताना कॅमेरेवाले दिसताच जाम भडकले. खाली व्हा, अगोदर कॅमेरे बंद करा, असे म्हणाले. दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमास सुरुवात केली.गेले नऊ दिवस चालू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाची सांगता काल रात्री प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने झाली. आ.धनंजय मुंडे यांनी इंदुरीकर महाराज यांचें स्वागत केल्यानंतर आ.धनंजय मुंडे कार्यक्रम पाहण्यासाठी समोर जाऊन बसले.इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रम सुरू करण्यासाठी माइक समोर उभे राहून इकडे तिकडे पाहिले.त्यावेळी त्यांना स्टेजच्या दोन्ही बाजूला पत्रकारांनी लावलेलेकॅमेरे दिसले.

कॅमेरे दिसतात इंदुरीकर महाराजांचा पारा चढला.अगोदर ते बंद कर. चल खाली हो. असा इंदुरकर महाराजांनी जागेवरून इशारा केला. तुमच्या चॅनल चा टीआरपी वाढवण्यासाठी काही कट छाट करून काहीही दाखवता. त्याची फळ मी भोगले आहेत. हे व्यावसायिक आहेत. असं महाराज समोर जमलेल्या हजारो रसिकांच्या समोर बोलल्याने सारे जण आवाज झाले. इंदुरीकर महाराज भडकल्यानंतर एक जण महाराजांच्या कानात हा कार्यक्रम लाईव्ह आहे हे सांगण्यासाठी गेला.परंतु महाराज त्यांचं काही ऐकेनात. तुम्ही अगोदर खाली व्हा असाच त्यांनी पवित्रा घेतला. महाराजांचा हा पवित्रा समोर बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या लक्षात आला.

आ.धनंजय मुंडे यांनी इंदुरीकर महाराज यांना विनंती केली. महाराज त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्या. तुम्ही आम्हाला अध्यात्म सांगा. त्यानंतर महाराज थोडे शांत झाले. आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमास सुरुवात केली.