परळी (दि. 09) - मानवाच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे, विज्ञानाने माणूस बुद्धिजीवी बनतो, पण सोबतीला अध्यात्माची जोड मिळाल्यास पुढील पिढ्या बुद्धिजीवी आणि सोबतच सुसंस्कृत व वैचारिक समृद्ध होतील, असे वक्तव्य प्रसिद्ध कीर्तन-प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी परळी येथे आयोजित कीर्तन सेवेत बोलताना केले आहे.
आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानद्वारे आयोजित करण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मागील 17 वर्षांपासून तशी नाथ प्रतिष्ठानची परंपरा आहे. यावेळी आ. धनंजय मुंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करत आशीर्वाद घेतले.
मागील प्रत्येक कार्यक्रमात मी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर यायचो पण आज कीर्तन असल्याने मी महाराज येण्याअगोदर इथे हजर झालो. संत-महंतांच्या पवित्र कीर्तनाच्या गादीचा मान राखण्याची, आदर करण्याची आमची परंपरा असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
नाथ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि सोबतच विविध जयंती-पुण्यतिथी, सण-उत्सव सार्वजनिक रित्या साजरी करण्याची परंपरा आम्ही सुरू केली. कोविड महामारीच्या नंतर प्रथमच आलेला गणेशोत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यात अनेकांनी वेगवेगळी विघ्ने आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी हा उत्सव साजरा करण्यामागे आमची प्रामाणिक भावना होती व त्यामुळे पुढेही यापेक्षा अधिक उत्साहात व जोमाने आम्ही विविध कार्यक्रमांचे व उत्सवाचे आयोजन करू, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी धनंजय मुंडे हे नेतृत्व कसे घडले यावर देखील प्रकाश टाकला. जनतेचं प्रेम मिळवून ते कायम टिकवून ठेवले, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कायम जपले, सर्व धर्मांच्या भावनांचा सन्मान राखून ते मार्गक्रमण करतात आणि सामाजिक कार्य व सेवा करताना ते राजकारण बाजूला ठेऊन कुणालाही मदत करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत, या चार गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांच्या यशाचे रहस्य दडलेले असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.
वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समारोप प्रसंगी इंदुरीकर महाराजांनी संत नामदेव महाराजांचा 'देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो।' हा अभंग कीर्तन-विवेचनासाठी निवडला. या अभंगाचे संत वाणींचे प्रमाण, श्रीमद भगवद्गीतेतील प्रत्यय, ज्ञानेश्वरीतील प्रमाण आदींचा सुरेख मेळ घालत व आपल्या खास विनोदी शैलीतून विवेचन करताना महाराजांनी ग्रामीण विकासासाठी खास संदेश दिला.
कोविड काळात दुरावलेली व पुन्हा जवळ आलेली माणुसकी आपण पाहिली, याचा विचार करून माणुसकी जपायची गरज आहे. गावांचा विकास व्हावा यासाठी ऊर्जेची बचत महत्वाची असून गावांमध्ये सौर ऊर्जेचा वापर अधिक व्हावा, आता शाळांना देखील डिजिटल करण्याची गरज आहे, कालानुरूप बदल घडले पाहिजेत. नद्यांना स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे, त्याचबरोबर पुढची पिढी प्रगल्भ, वैचारिक आणि सुसंस्कृत घडवण्यासाठी प्रयत्न होणे देखील गरजेचे आहे, असा मोलाचा संदेश निवृत्ती महाराजांनी आपल्या किर्तनामधून दिला.
तत्पूर्वी परळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर, पो.नि. सुरेश चाटे यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली. तसेच धनंजय मुंडे यांच्या हस्ते मागील दहा दिवसातले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले संजरी मंडप चे मिनहाज फारुकी, आबा ढोले, शेख बिलाल, भगवान पावडे, मुन्ना वळसे, श्रीराम गोंडे, वैजनाथ झरकर, गणेश भोसकर यांचाही श्री. मुंडेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गायनाचार्य, मृदंगचार्य, भरत महाराज सोडगिर, वाल्मिक महाराज फड, रुक्षराज महाराज आंधळे, रानबा महाराज फड, दत्ता महाराज फड, मनोहर महाराज फड, सुभाष महाराज चाटे, अंकुश महाराज गुट्टे, रामेश्वर महाराज कोकाटे, श्रीराम महाराज मुंडे, राजभाऊ महाराज आंधळे यांसह वारकरी संप्रदायातील महानुभाव तसेच पदाधिकारी तसेच परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.